एक उद्योजिका म्हणून माझी ओळख

शेवटचे अपडेट: May 7, 2021

परिचय

आपल्या समाजात एका  स्त्रीची ओळख नेहमी  अमुकांची मुलगी, अमुकांची बायको, आई किंवा सून अशी नात्यांच्या संदर्भात केली जाते. वर वर पाहता आपल्याला त्यात काही चूक आहे असे वाटत नाही कारण पितृसत्ताक पद्धतीत जन्म घेतलेल्या आणि लहानाचे मोठे झालेल्या आपल्याला त्याची इतकी सवय आहे की ही ओळख आपण संपूर्णपणे मान्य केली आहे. इतकेच नव्हे तर त्याचा आपल्याला अभिमानही वाटतो. परंतु ह्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो ह्याचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की,  आपण नेहमी स्वतःला दुय्यम मानत आलो.

ह्या ओळखीमुळे आपण कायम कुणाच्या वर तरी अवलंबून आहोत असे वाटायला लागते आणि मग तीच सवय लागते. आपण एक व्यक्ती म्हणून जगणे जणू विसरूनच जातो. स्वतःच्या आवश्यकतांकडे दुर्लक्ष करायला लागतो आणि आत्मसन्मान, स्वनिर्णय क्षमता, आपल्या योग्यतेची समज ह्या सगळ्यापासून पासून वंचित रहातो. अर्थात ह्यात  फक्त आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजालाही काहीही वावगे वाटत नाही. आणि सर्व स्त्रियांना कुणावर तरी अवलंबून रहाणे आवडते अशा गोड गैरसमजात आपण सगळे जगत रहातो. कुणाला वाईट वाटलेच तर स्त्रीचा जन्मच असा असे म्हणून तिची समजूत काढली जाते.

पण स्वतंत्रपणे कामासाठी बाहेर पडल्यावर किंवा उद्योजिका झाल्यावर ह्याचे परिणाम दिसायला व जाणवायला लागतात. उद्योजिका झाल्यावर आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात व त्यासाठी दुसऱ्या कुणावरही अवलंबून रहाणे योग्य नसते. एकतर दुसरा कुणीही कायम आपल्या व्यवसायात निर्णय घेण्यासाठी उपलब्ध नसतो आणि त्याला आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती ही नसते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या निर्णयाचे परिणाम त्याला भोगायला लागणार नसल्यामुळे तो योग्य निर्णय देईल ह्याची खात्री नसते. त्यामुळे स्वतंत्र विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची आपली क्षमता पडताळून पहाणे व वाढवणे जरुरीचे ठरते. म्हणूनच स्वतःची ओळख निर्माण करणे आणि  स्वतःच्या क्षमता ओळखणे आवश्यक आहे.

त्याच बरोबर एका उद्योजिकेची भूमिका निभावताना एक वेगळाच मार्ग आपण स्वीकारत असल्यामुळे इतरही अनेक आव्हाने समोर येऊ शकतात. त्यामुळे कोणती आव्हाने येऊ शकतील व  त्यांचा सामना करण्यासाठी आपली कोणती तयारी असणे आवश्यक आहे हाही विचार करायला हवा. आपल्या भूमिकांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का ? कुणाचे सहाय्य लागेल का ? इत्यादीबद्दल विचार करणे आवश्यक आहे. ह्या भागात अशा अनेक बाबींचा आपण विचार करणार आहोत.