माण देशी उद्योजिका प्रशिक्षण कार्यशाळा (देशी एमबीए)

शेवटचे अपडेट: May 8, 2021
Current Status
Not Enrolled
Price
Free
Get Started

देशी एम बी ए बद्दल थोडेसे

माण देशी फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील रोजगारावर  काम करणाऱ्या महिलांना एक उद्योजिका  म्हणून उभे करण्यासाठी कार्यरत आहे. अनेक पिढ्यांपासून घरात व बाहेरही गौण गणल्या गेलेल्या व सतत एक न्यूनगंड मनात बाळगणाऱ्या ह्या महिलांना स्वतंत्रपणे एक उद्योजिका म्हणून काम करणे तितकेसे सोपे नाही याची जाणीव माण देशी फौंडेशनला आहे. आणि म्हणूनच ह्या महिला उद्योजिकांची ताकद आणि त्यांच्या मर्यादा यांचा विशेष विचार करूनच त्याना योग्य होईल अशा पद्धतीने माण देशी फौंडेशनने  हे ‘देशी एम.बी. ए. प्रशिक्षण’ विकसित केले आहे.

ह्या प्रशिक्षणाचा उद्देश महिलांना एक उद्योजिका होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे ज्ञान व कौशल्य देणे हा तर आहेच पण त्याच बरोबर सर्व प्रथम त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांची अस्मिता जागृत करणे हा ही आहे. प्रशिक्षणाच्या शेवटी ह्या आत्मविश्वासाच्या व ज्ञान आणि कौशल्यांच्या बळावर त्यांना स्वतःचा व्यवसाय अधिक चांगल्या रीतीने चालवता व वाढवता आला पाहिजे ह्यासाठी ह्या प्रशिक्षणाचा पद्धतशीर विकास करण्यात आला आहे. प्रशिक्षणातील सर्व अभ्यास सहभागी शिक्षण पद्धतीवर आधारित असून त्यात सहभागी होताना ह्या महिलांच्या कोणत्याही मर्यादा आड येणार नाहीत अशाच पद्धतीने त्यांची  रचना केली गेली आहे. प्रशिक्षण कुठेही झाले तरी त्याचा दर्जा समान असला पाहिजे याकरिता  ह्या पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. 

प्रशिक्षणाची सुरवात ‘स्वयंविकास’ ह्या मॅाड्यूलपासून केली आहे. ह्यानंतर येणारी सर्व मॅाड्यूलस् उदाहरणार्थ – व्यवसायाची योजना तयार करणे, अर्थ व्यवस्थापन (आंतरिक व बाहेरून पैशांचा प्रबंध करणे), बाजारनीती व विक्रीचे डावपेच इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत.

देशी एम. बी. ए. ह्या प्रशिक्षणात ह्या पुस्तिकांवर आधारित अभ्याक्रमाखेरीज विशेष विचार विनिमयासाठी या उद्योजिकांसाठी मार्गदर्शक (mentors) नेमण्याचाही समावेश आहे.   हे मार्गदर्शक प्रत्येक उद्योजिकेला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करतात.

ह्याखेरीज  महिला उद्योजिकांना त्यांच्या मालाच्या मार्केटिंगसाठीही मार्गदर्शन केले जाते व त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या सरकारी किंवा गैरसरकारी संस्थाबरोबर त्यांना जोडून दिले जाते. महिला उद्योजिकांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या शहरात महोत्सव आयोजित केले जातात व तिथे त्यांना आपल्या मालाची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. मिळवलेल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा वापर करून बघण्यासाठी उद्योजिकांना  हे महोत्सव एक अमूल्य संधी प्रदान करतात. प्रशिक्षणाच्या संपूर्ण काळात उद्योजिकांच्या प्रगतीचे निरीक्षण केले जाते व प्रशिक्षणाच्या शेवटी त्या संपूर्ण आत्मविश्वासाने आपला व्यवसाय चालवू शकतील हे निश्चित केले जाते.  

देशी एम.बी. ए. प्रशिक्षणाने देश-विदेशातील विविध भागात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांमध्ये माण देशी फौंडेशनला एक विशेष स्थान मिळवून दिले आहे.

यामध्ये आपण पुढील विषयांचा अभ्यास करणार आहोत

१) स्वयं विकास

२) अर्थ व्यवस्थापन

३) अर्थ व्यवस्थापन २ ( कर्ज व्यवस्थापन )

४) बाजारनीती

५) व्यवसायाची योजना

चला तर मग सुरुवात करूयात…