माण देशी अकॅडेमी

माण देशी अकॅडेमी

माण देशी फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील रोजगारावर काम करणाऱ्या महिलांबरोबर १९९६ पासून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करत कष्टाने जीवन जगत असतात. अत्यंत कमी उत्पादन गटातून आल्यामुळे रोजखर्चासाठीही त्यांना अनेकवेळा पैशांची चणचण भासते.

अशा चणचणीच्या वेळी त्या भावनांच्या आहारी जातात आणि सावकाराकडून कर्ज घेऊन आपली गरज भागवतात. सर्व अडचणींसाठी कर्ज काढणे व आजची गरज भागवणे हा एकच मार्ग त्यांना माहीत असतो.

आपल्याला कर्जाची परतफेड करता येईल का, ह्याचा विचार त्यांनी केलेला नसतो आणि परिणामी त्या कर्जबाजारी होतात. असेल नसेल ती मालमत्ता त्या गमावून बसतात. दारिद्र्याबरोबर सतत झुंजण्यातच त्यांची सर्व शक्ती जाते.

महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करणे त्यांच्यासाठी आणि देशासाठी अतिशय जरुरीचे आणि महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर एक उद्योजिका म्हणून त्यांना उभे करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.

पिढ्यांपिढ्या घरात आणि बाहेर गौण गणल्या गेलेल्या व सतत एक न्यूनगंड मनात बाळगणाऱ्या ह्या महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करणे, त्यांना स्वतंत्रपणे उभे करणे, त्यांना योग्य ती कौशल्ये शिकवणे, त्यांची ताकद वाढवणे हे काम माण देशी आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमातून करत आली आहे.

माण देशी अकॅडेमी च्या निर्मितीतून हे प्रशिक्षण डिजिटल माध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा माण देशीचा मानस आहे.

आमच्या ह्या प्रवासात तुम्ही सहभागी व्हावे आणि ह्या प्रशिक्षणाचा लाभ अनेक महिलांना मिळावा हीच सदिच्छा आहे.

चेतना सिन्हा यांची मुलाखत